मित्रांनो, आपला आजूबाजूला अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असतात. परंतु त्याचा उपयोग कोणत्या आजारावर करावा व कसा करावा? हे आपल्याला माहित नसते. त्यामुळे आपल्याला औषधी गुण माहित होत नाही. यासाठी आजच्या लेखांमध्ये आपण एक अशा वनस्पतीची माहिती जाणून घेणार आहोत की ती सर्वांच्या माहितीतील आहे.
आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते. ही वनस्पती भारत, बलुचिस्तान, श्रीलंका, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे आढळते. प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय प्रदेशात भारतात, महाराष्ट्रात सर्वत्र ही वनस्पती आढळते. आघाड्याची पाने तशी पाहिली तर अगदी लहान असतात. पण ही पानं पुजेत नसली तर पुजा पुर्ण होत नाही. या पानांना पुजेत एवढे महत्त्व यासाठी असते की त्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आहेत.
आघाडा ही वनस्पती भूक वाढविणारी आणि वातदोषासह हृदयरोग आणि अनेक आजारांवर गुणकारी आहे. आघाड्याचा उपयोग करून श्वसनासंबंधी अनेक आजारांवरही मात करता येते. औषधी उपयोग करण्यासाठी आघाड्याची पाने वाळवून ती जाळली जातात आणि त्यापासून राख तयार केली जाते. वेगवेगळ्या आजारांवर उपाय म्हणून ही राख वेगवेगळ्या पद्धतीने वापरली जाते. काही आजारांमध्ये ही राख घालून त्याचे पाणी प्यायले जाते तर काही आजारांमध्ये मधात टाकून ही राख घेतात. याबाबत असे सांगितले जाते की आघाड्याची राख पाण्यात मिसळल्यानंतर ते पाणी उन्हात सुकवतात.
जेव्हा सगळे पाणी आटून जाते तेव्हा मीठासारखा पदार्थ उरतो. या पदार्थाला आघाड्याचा क्षार असे म्हणतात. या क्षारामध्ये अनेक आरोग्यदायी खनिजे असतात. आघाड्याचा काढा अतिशय पाचक असतो. अपचनाचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असल्यास आघाड्याचा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. किडनी संदर्भात काही आजार असतील, तर आघाडा अतिशय परिणामकारक ठरतो. काही संसर्गामुळे मुत्र नलिकेत दाह होत असल्यास आघाड्याचा काढा घेतल्याने हा त्रास कमी होतो.
शरीरावरची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी म्हणजेच फॅटबर्नसाठी आघाड्याच्या बिया अतिशय उपयुक्त आहेत. दमा, अस्थमा, जुनाट खोकला, कफ असा त्रास कमी करण्यासाठी आघाड्याचा क्षार खूपच परिणामकारक असतो. दात किंवा हिरड्या दुखत असल्यास आघाड्याच्या पानांचा रस काढावा आणि तो हिरड्यांवर चोळावा. दातदुखीतून लगेचच आराम मिळतो.अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत. श्वासनलिकाशोथ व कफरोगात आघाड्याचा क्षार हे दिव्य औषध आहे. विषमज्वरात आघाड्याची राख किंवा मुळाचे चूर्ण खायच्या पानांच्या रसातून देतात.
आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहेत. उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा व तुऱ्यांचा रस मधाबरोबर देतात. विंचूदंशावर आघाड्याचा पाला वाटून लावतात व मूळ उगाळून पिण्यास देतात. रातांधळेपणात आघाड्याच्या मुळाचे चूर्ण देतात. दातदुखीत पानांचा रस हिरड्यांवर चोळतात किंवा आघाड्याचा क्षार किडलेल्या दातांच्या ढोलीत भरतात. चामखीळ काढण्यासाठी क्षार वापरतात. कानात मळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याचा क्षार तिळाच्या तेलात उकडून, वस्त्रगाळ करून ते तेल कानात घालतात.
संधिशोथात आघाड्याची पाने ठेचून, गरम करून दुखणाऱ्या सांध्यावर बांधतात. अंगात काटे शिरल्यास आघाड्याचा अंगरस देतात व पाने वाटून जखमेवर लावतात. मज्जातंतू व्यूहाच्या रोगात आघाड्याच्या अंगरसाने फायदा होतो. आघाड्याच्या मुळाचा फांट आतड्याच्या रोगात उपयुक्त आहे. आघाड्याच्या बिया वांतिकारक आहेत, तसेच बीजचूर्ण शिरोवेरेचक आहे.
आघाड्याची राख बाह्य त्वचेवरील व्रणांसाठी उपयुक्त आहे.
आघाडा कडू, तिखट, उष्ण, रेचक, दीपक, वायुनाशी, आम्लतानाशक, रक्तवर्धक, मूत्रजनक, मूत्राम्लतानाशक, स्वेदजनन, कफघ्न, पित्तसारक गुणधर्माचा आहे. ही वनस्पती भूक वाढवणारी, वात, हृदयरोग, मूळव्याध, मुतखडा, पोटदुखी, जलोदर, अपचन, आमांश, रक्तरोग, श्वासनलिका दाह इत्यादी रोग व विकारांत उपयुक्त आहे.
आघाड्याची राख वैद्यकीय द्रवात अग्रगण्य आहे. आघाड्याचा क्षार, मज्जातंतू व हाडांना, तसेच रक्तकणांना उपयुक्त आहे. आघाडा वनस्पती वाळवून नंतर जाळली जाते. त्यापासून मिळवलेली राख पाण्यात मिसळतात.
वस्त्रगाळ करून गाळलेले पाणी उन्हात सुकवतात. त्यापासून मिठासारखा क्षार जमतो. या क्षारामध्ये चुना, लोह, जवखार, मीठ, गंधक, सोरा खार इत्यादी घटक असतात. जेवण्यापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो, तर जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते. यकृतावर आघाड्याची क्रिया फार हितावह आहे. यामुळे यकृताच्या सर्व क्रिया सुधारतात.
पित्ताश्मरीत व अर्श रोगात आघाडा वापरतात.आमवात, क्षारयुक्त संधिशोथ, गंडमाळा या रोगांत आघाडा गुणकारी आहे.आघाडा मूत्रजनन आहे. त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनक पेशींवर होते. यामुळे आघाडा मूत्रपिंडोदरात उत्तम कार्य करतो. आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते. मूत्रनलिकेचा दाह आघाड्यामुळे कमी होतो. यामुळे बस्तिशोथ, मूत्रपिंड शोथ, तसेच मूत्रेंद्रियांच्या रोगात आघाडा वापरतात.
अशाप्रकारे अनेक औषधी गुण या वनस्पतीमध्ये आहे.