मित्रांनो, या जगामध्ये प्रत्येक माणसाचे हे स्वप्न असते की त्याला यश मिळावे, कीर्ती मिळावी, समृद्धी मिळावी, संपन्नता मिळावी. प्रत्येक माणसाची ही इच्छा असते की माझे आयुष्य सुखात आणि आनंदात गेले पाहिजे. पण फक्त इच्छा करून गोष्टी मिळत नाहीत जोपर्यंत आपण ती मिळवायचा प्रयत्न करत नाही, जोपर्यंत आपण त्या गोष्टींसाठी काम करत नाही. आयुष्यात तुम्हाला काहीही हवे असेल पण तोपर्यंत ते मिळणार नाही जोपर्यंत तुमच्या मनात त्या हव्या असलेल्या गोष्टींची स्पष्टता येत नाही.
तुम्हाला आयुष्यात जे काही पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही मनामध्ये स्वतःला प्रश्न विचारा. जगामध्ये एक नंबरला असलेले मोटिवेशनल स्पीकर टोनी रॉबिन सुद्धा म्हणतात तुम्हाला जर खरंच आयुष्य बदलायचं असेल तर रोज स्वतःला क्वालिटी प्रश्न विचारा. यशस्वी लोक नेहमी स्वतःला क्वालिटी प्रश्न विचारत असतात म्हणूनच त्यांना उत्तरे सुद्धा त्याच क्वालिटीची मिळतात. आणि म्हणून ते यशस्वी होतात. आजच्या लेखामध्ये आपण तीन असे प्रश्न पहाणार आहोत जे तुम्ही रोज स्वतःला विचारले तर खात्रीने सांगतो तुमचे आयुष्य बदलल्या शिवाय रहाणार नाही.
पहिला प्रश्न, माझ्या आयुष्यामध्ये मला काय पाहिजे आणि माझी ध्येय काय आहेत? मित्रांनो जोपर्यंत तुम्हाला हेच माहिती नसेल की तुम्हाला कोणत्या मुक्कामाला पोहचायचे आहे तोपर्यंत तुम्ही रस्ता निवडू शकणार नाही. जेंव्हा तुम्ही रोज स्वतःला हा प्रश्न विचारता मला आयुष्यात नक्की काय करायचे आहे? मला नक्की काय मिळवायचे आहे? कुठे पोहचायचे आहे? तेंव्हा तुम्हाला रस्ते आपोआप सुचायला सुरुवात होते.
अनेक कमेंट येतात की सर आम्हाला कळतच नाही की आम्हाला आयुष्यात करायचे काय आहे? या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडेच आहे. जेंव्हा तुम्ही रोज हा प्रश्न स्वतःला विचाराल तेंव्हा त्याचे उत्तर तुमच्या आतमधूनच येईल. कारण प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे आहे. एका माणसाच्या आयुष्याचे उत्तर दुसऱ्याला कामी येणार नाही. आणि नक्की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आणि तुम्ही कुठे पोहचणार आहात हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. आणि त्यासाठी काय केले पाहिजे हे सुद्धा तुम्हालाच ठरवावे लागेल.
त्यामुळे रोज हा प्रश्न स्वतःला जरूर विचारा की मला आयुष्यात कुठे जायचे आहे? लोक या गोष्टींचा कधी विचारच करत नाहीत. ते विचार न करता आपले आयुष्य नुसते पुढे ढकलत असतात. आपल्याला कुठे जायचे आहे? काय मिळवायचे आहे? असा विचारच कधी त्यांच्या मनाला शिवत नाही. हे जग धावतय म्हणून आम्ही सुद्धा धावत आहोत पण काहीच स्पष्टता नाही की पोहचायचे कुठे आहे? म्हणून सर्वात आधी तुम्हाला हे स्पष्ट होणे गरजेचे आहे की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे?
दुसरा प्रश्न, तुम्हाला आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय आहे? मित्रांनो दुसरा प्रश्न रोज तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व कशाला देता? काही लोक म्हणतात की आम्हाला सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचा परिवार आहे. काही लोक म्हणतात सर्वात जास्त महत्त्वाचे आम्हाला आमचे आरोग्य आहे. आणि काही लोक म्हणतात सगळ्यात महत्त्वाचे आम्हाला मन शांती आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत पण जे काही असेल तुमच्या आयुष्यात जे महत्त्वाचे आहे त्यावर तुम्ही काम करता का त्याच्यासाठी? तुम्ही वेळ काढता का?
जर तुम्हाला परिवार महत्त्वाचा असेल, तुमची बायको, तुमचा नवरा, तुमची मुले, तुमचे आई-वडील त्यांच्यासाठी तुम्ही वेळ काढता का? आज लोक आयुष्यात एवढे व्यस्त झाले आहेत की त्यांना परिवारासाठी वेळच नाहीये. मुलांना आई-वडीलांसाठी वेळ नाहीये. जर तुमच्या आयुष्यात परिवार महत्त्वाचा आहे तर तुम्हाला परिवारासाठी वेळ काढावा लागेल. तुमच्या परिवरामध्ये आनंद कसा येईल, तुमच्या परिवरामध्ये प्रत्येक व्यक्ती आनंदी कशी राहील यावर तुम्ही काम करा.
आणि जर तुम्हाला आरोग्य महत्त्वाचे वाटत असेल तर तुम्ही त्यावर सुद्धा काम करा. नुसते मला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे बोलून चालणार नाही. त्यावर तुम्हाला काम सुद्धा करावे लागेल. आणि जर तुम्हाला हे वाटत असेल की मन शांती तुम्हाला आयुष्यात महत्त्वाची आहे तर तुम्हाला त्यावर सुद्धा काम करावे लागेल. आणि हे काम तुम्ही कधी करू शकाल? जेंव्हा तुम्ही रोज हा प्रश्न स्वतःला विचाराल जोपर्यंत तुम्ही या गोष्टींचा विचार करणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावर काम करू शकणार नाही.
तिसरा प्रश्न, आजचा दिवस मी माझे आयुष्य बदलण्यासाठी कसा वापरू शकतो? मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला दिवस सुरू होताना रोज विचारला पाहिजे तो म्हणजे, माझा आजचा दिवस माझ्या उज्वल भविष्यासाठी याचा कसा वापर करू शकतो? आजच्या दिवसाचा वापर करून मी माझ्या भविष्य काळात आनंदी कसा होईल? आजच्या दिवसाचा वापर करून मी स्वतःचे अजून कसे चांगले व्यक्तिमत्त्व बनवू शकतो? जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज हा प्रश्न तुम्हाला स्वतःला सारखा विचारावा लागेल. मित्रांनो एक लक्षात ठेवा तुमचा भूतकाळ हा गेलेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल जास्त विचार करून काही फायदा नाही. तुमच्याकडे वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आहे पण तुम्ही आत्ता वर्तमानामध्ये काय करता याच्यावर तुमचे भविष्य असणार आहे म्हणून आजचा दिवस तुम्ही ध्येय गाठण्यासाठी त्याचा वापर करणार आहात की टाईमपास करून वाया घालवत आहात हे सर्वस्वी तुम्ही तपासून बघा.
एक लक्षात ठेवा तुम्हाला जर कोणी यशस्वी बनवणार असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. तुम्हाला कोण मन शांती देणार असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. जर तुम्हाला आयुष्यात हवं ते देणारे कोण असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. कोणी दुसरा येणार नाही. हे जग सुद्धा तुमच्यासाठी तेंव्हा करेल जेंव्हा तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी काहीतरी कराल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आयुष्यात यश पाहिजे, समृद्धी पाहिजे, संपन्नता पाहिजे, तर रोज स्वतःला ही तीन प्रश्न विचारायला कधीच विसरू नका.
अशाप्रकारे हे काही तीन प्रश्न आहेत जे तुम्ही बरोबर स्वतःला विचारायला हवेत जाने तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल.