मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे लोक आपणास सोबत वावरत असतात त्यातील काही लोक आपल्या हिताचे जाणत असतात तर काही लोक आपले वाईट कसे होईल याचा विचार करतात व आपल्याला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. अशा त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करण्याचे आठ प्रभावी मार्ग आजच्या या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
1. सर्वप्रथम यांना टाळु नका, टाळून किती टाळणार? कधी ना कधी समोर जावेच लागेल, त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिकावे. ही माणसं जे काही सांगणार आहे ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवावे की 100 टक्के हा आपल्याला तणाव येईल असच बोलणार आहे किंवा सांगणार आहे.यानंतर तो बोलून गेल्यावर स्वतः ला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं, ते आठवाव की वाटलंच होतं मला हा असच काही बोलेल… तो स्वतःकाहीही सांगू देत किंवा विचारू देत, आपण मात्र यांच्याशी एका शब्दाच कम्युनिकेशन ठेवायचं.. जसं की हो, बरोबर, अच्छा, चालेल, बर, ठीक आहे अशाप्रकारे… याचा फायदा असा की कुत्रा भुंकून किती भुंकेल ? थकल्या वर शांत बसेल. तो जे काही सांगतोय तिथे उत्सुकता दाखवू नये, आपण ऐकण्यात कमी interest घेतला तर त्याच बोलणं आपोआप कमी होतं.
2. लहरी माणसांवर टीका करणे बंद करा – तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल.तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका. कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे. त्यांचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही.
तेच तेच विचार पिच्छा पुरवतील. याचा त्रास त्यांना नाही तर तम्हालाच होईल. जेव्हा अशी माणसे भेटतात ना तेव्हा त्यांच्या विचित्र वागण्यामुळे आपल्या मनात एक प्रकारचं वादळ सुरू असतं आणि या सगळ्या त्रासदायक भावना कोणाला तरी सांगून मोकळं व्हावं असं तुम्हाला वाटतं. म्हणून तुम्ही सतत त्या व्यक्तीने तुमच्याशी केलेले अयोग्य वर्तन, तुमच्यावर झालेला अन्याय आणि झालेल्या मानसिक कोंडमारा इतरांना सांगता.यामागे इतरांकडून आपण कसे योग्य आहोत. यावर शिक्का मोर्तब करून घेणे. ही सुद्धा एक इच्छा असू शकते.
3. स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नये, आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र 100% त्याचा गैरवापर करेल… आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही यांच्या जवळ सांगू नये, कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात करायला खूप छान जमतं यांना एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नये म्हणजे त्याला पुढे आपल्याशी चर्चा करायचा टॉपिक कमी होतो.
यांच्याशी कधीही नजर चुकवून बोलू नये, त्यांचा गैरसमज होतो की त्यांना आपण घाबरतोय हे त्यांना कुठे माहिती की आपले डोळे त्यांचा तिरस्कार करतात म्हणून बघत नाहीत ही माणसं आपल्याला काही बोलल्यावर काही जोक ऐकल्या सारखं दाखवावं, मग जरीही तुम्हाला त्या गोष्टीच टेन्शन आलं असेल तरीही कुठल्या अडचणीत असलो तरीही त्यांच्या समोर सर्व ओके दाखवावं त्यांना समजलं की आपण कुठल्या त्रासात आहोत मग तर बस “लोहा गरम है, हथोडा मार दे” अस होतं.
4. स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थरा देऊ नका. नकारात्मक माणसे तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कटुता, संताप, निराशा निर्माण करते. दररोज ही माणसे अवतीभोवती असली की या भावना अजूनच घट्ट मूळ धरतात मग आपले मन नको त्या कल्पना करू लागते. जे प्रसंग वास्तविक घडलेले नाहीत ते सुद्धा मनात खेळ करू लागतात. त्या व्यक्तीला एखाद्या प्रसंगात मी असे उत्तर देईन तिचा सुद्धा असा अपमान करेन हे विचार घोळत राहतात आणि मग मन आपण जसं वळवू तसं वळतं.
जे खाद्य मनाला देऊ त्यावर त्याचं पोषण होतं. मग जर सतत नकारात्मक माणसांचा विचार केला तर मनात तशाच भावना उत्पन्न होतात. त्यामुळे आपल्यावर सतत एक प्रकारचा मानसिक ताण राहतो. यामुळे लवकर थकवा जाणवणे, कामात लक्ष न लागणे, चंचलता झोप न लागणे चिडचिड अशा अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून स्वतःच्या मनात या कल्पनांना थारा देऊ नका. यासाठी उत्तम उपाय म्हणजे या सर्व गोष्टींच्या मुळावर घाव घालणे.
म्हणजे काय करायचं? तर ज्या क्षणी तुमचं मन या विक्षिप्त माणसांच्या वागण्याचा विचार करून एखादा काल्पनिक प्रसंग रंगवणे सुरू करेल. त्याच क्षणी मनाला रोखायचं. त्याला पुढे जाऊच द्यायचं नाही. त्याचा मार्ग वळवून एखाद्या चांगल्या गोष्टीकडे न्यायचा. संगीत, वाचन, व्यायाम किंवा नवीन स्किल शिकणे यात मनाला गुंतवणं कधीही चांगलं. यामुळे मनावरचा ताण तर कमी होईलच. पण कल्पनेतील भूत तुमच्या मेंदूचा भुगा करणार नाहीत. म्हणून आपल्याला जेव्हा तिरसट माणसांसोबत राहावं लागतं. तेव्हा चांगले छंद जोपासणं खूपच गरजेचं असतं.
5. या लोकांशी आपला आनंद, यश शेअर करू नये, असं तोंडावर तर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदाला विरजण लावायचं याची तयारी करतील ही माणसं image conscious असतात, बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दामून ते आपल्याशी चांगल बोलतात सर्वात महत्वाचे म्हणजे अशालोकांकडून कधीही चुकूनही आर्थिक मदत येऊ नये.
म्हणजे उगीचच त्याला tolerate करायची गरज नाही ही लोकं ठरवून येतात एक टार्गेट घेऊन, की ह्या माणसाला आपल्याला मनातून कसंही करून मनातून अस्थिर करायच आहे, त्या यावेळस त्याच्या गोष्टी ऐकण्या पेक्षाही महत्वाचे काम आहेत ते दाखवले पाहिजे ही माणसं समोर. आल्यावर डोक्याचं आणि मानाचं दार लावून घ्यायचं. दस्टबिन ओपन करून ठेवायचा, जेणेकरून तो जे काही निरर्थक बोलेल ते डोक्यात, मनात न जाता डस्टबिन मध्ये जाईल…
6. तापदायक माणसांना धन्यवाद द्या. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? आपल्याला एवढा त्रास देणाऱ्या माणसांना का थैंक्स म्हणायचं.तर थोडा खोलवर विचार करा. जी माणसं आपल्या साध्या वागण्या बोलण्यातून इतरांना सतत छळत राहतात. त्यांच्याकडून आपण बरंच काही शिकू शकतो. यांच्या वर्तनामुळे आपल्याला जो त्रास होतो त्यातून हेच शिकायचं की आपण इतर कोणत्याही व्यक्तीशी असं वागायचं नाही. बेतालपणे न बोलणं इतरांच्या मतांचा आदर करणं. दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं.
किती महत्त्वाच आहे हे यांच्या बोलण्यातून समजतं. आपल्याला जीवनातील एवढी मोठी शिकवण दिली म्हणून आपण यांना धन्यवाद दिलेच पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर ही माणसं आपल्याला कृतज्ञता म्हणजेच काय हे शिकवतात. आणि जेव्हा आपल्याला आयुष्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टींबाबत कृतज्ञता वाटू लागते. तेव्हा आपली नजर स्वच्छ होते. मग कुठल्याही वाईट प्रसंगातून काय चांगलं तेवढंच निवडायचं हे मनाला कळतं.
एकदा का ही समज आली की कितीही तिरसट विक्षिप्त आणि लहरी व्यक्तींशी तुम्ही संवाद सादू शकता त्यांच्याशी आवश्यक तेवढं बोलून आपलं काम करू शकता. कारण आता त्यांची वाईट बाजू ही तुमच्यासाठी एक लाईफ लेसन झालेली असते. त्यांच्या वाईटपणातून धडा घेऊन तुम्ही चांगुलपणा अंगी बानवत असता, म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद द्या. या तुम्हाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यात मोठा हातभार लावतात. कमळाचे उदाहरण लक्षात ठेवा.आजूबाजूला इतका चिखल असतो, पण कमळ काही फुल सोडून देत नाही.
7. स्वतःभोवती एक कुंपण घालून घ्या, आपल्या मर्यादा ओळखा. दुसऱ्याकडून होणारा अपमान, टोमणे सहन करणं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं याला पण एक मर्यादा असते. उगाच वादावादी नको म्हणून काही गोष्टी आपण सहज सोडून देतो. पण समोरची व्यक्ती जर ऐकतच नसेल तर या नकारात्मकतेपासून स्वतःचं संरक्षण करणं आवश्यक आहे. अशा वेळी बाउंड्रीज या ठरवाव्या लागतात म्हणजेच या ठराविक एका मर्यादेपर्यंत मी समोरच्या व्यक्तीला बोलू देईन. पण ज्या क्षणी तो आपलं ताळतंत्र सोडेल तेव्हा मात्र स्पष्ट शब्दात हे चुकीचा आहे आणि मी हे खपून घेतलं जाणार नाही याची तिला जाणीव करून देणे.
यामुळे काय होतं की आपोआपच तुम्हाला दुखवणारी व्यक्ती एका अंतरावर राहते. त्यांचे शब्द कृती यांनी तुम्ही घायळ का होता, कारण या माणसांना तुम्ही स्वतःच्या, मनात हृदयात जागा देता. जर त्यांच्यात आणि आपल्यात भावनिक अंतर ठेवलं तर मग असे घाव तुम्हाला जखमी करत नाहीत. विक्षिप्त माणसे जर तुमची मित्र मंडळी किंवा दूरचे नातेवाईक यापैकी असतील तर तुम्ही शारीरिक अंतर सुद्धा ठेवू शकता. म्हणजेच त्यांनी दिलेले आमंत्रण नम्रपणे टाळणे किंवा एखाद्या ठिकाणी ते येणार असतील त्यावेळी आपण त्या ठिकाणी न जाणे, असे उपाय तुम्ही करू शकता. पण खरी कसोटी असते की ज्यावेळी अशी तिरसट माणसं तुमच्या अगदी जवळच्या नात्यात किंवा घरातच असतात.
अशा वेळी त्यांच्यापासून शरीराने दूर निघून जाणं शक्य नसतं. पण आपला मानसिक छळ होऊ न देणं, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अशा वेळी मानसिकरित्या तुम्ही त्यांच्याशी अंतर ठेवून वागू शकता. म्हणजे गरजे इतका संवाद ठेवणे त्यांच्याकडून मदतीची कौतुकाची अपेक्षा न ठेवणे. त्यांनी जरी कोणत्याही विषयावर बोलणे सुरू केले तरी आपले मत किंवा सल्ला न देणे. फक्त हो, नाही, बरं अशा थोडक्या शब्दात बोलणे किंवा आटोपते घेणे. यामुळे हळूहळू त्यांनाही कळेल की एका ठराविक मर्याद पलीकडे तुम्ही त्यांना आपल्या आयुष्यात येऊच देत नाही आहात, आणि मग कदाचित तेच तुम्हाला त्रास देणे थांबवतील. दुसरी शक्यता अशी आहे की दाद देत नाही हे लक्षात आल्यावर सतत तुमच्याशी बोलण्याचा मुद्दामहून प्रयत्न करतील.
पण आता तुमच्या मनात एक लक्ष्मण रेषा आखलेलीच आहे. त्यामुळे कोणत्याही तापदायक व्यक्तीला तुम्ही ती पार करू देणारच नाही. या बाउंड्रीज आपलं संरक्षण करतात. यांचा वापर कसा करायचा हे सरावाने जमतं. जी व्यक्ती आपल्या भावनांशी खेळते तिच्यासमोर मनाची पाटी अगदी कोरी ठेवायची किंवा मनाचा दगड करूनच तिला समोर जायचं. हे कुंपण आपण तयार करत असतो त्यामुळे आपलं संरक्षण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कसं होईल हे आपणच आपलं पाहायचं असतं.
8. स्वतःचं वागणं तपासून पहा. कधी कधी असं वाटतं की आपल्या सभोवताली असलेल्या सर्व व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत. ते आपल्याला समजून घेत नाहीत. मानसिक छळ करतात पण वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी असू शकते. जेव्हा तुम्ही इतरांकडे एक बोट दाखवता तेव्हा बाकीची बोट तुमच्या कडे वळलेली असतात त्यामुळे स्वतःचं वागणं नीट तपासून पहा. आपण काही चुकतोय का हे शोधायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. काही व्यक्तींना इतरांचं साधं बोलणं पण खटतं. चेष्टा मस्करी केलेली चालतच नाही मग दुसऱ्या कोणी सहज
गमतीने केलेली शाब्दिक कोटी ते अति गांभीर्याने घेतात अशा व्यक्तींना समाजात मिळून मिसळून राहता येत नाही. सतत कोणीतरी आपला अपमान करत, आहे असं त्यांना वाटतं. अतिभावना प्रधान स्वभाव घातक ठरतो त्यामुळे आयुष्यात फार गंभीरपणे वावरू नये. खेळीमेळीने वागताना इतरांकडे थोडं दुर्लक्ष करणं, पण जमलं पाहिजे.
त्याचप्रमाणे अति अहंकार सुद्धा काही उपयोगाचा नाही. त्यामुळे आपण सर्वांपेक्षा वरचढ आहोत, अशी भावना निर्माण होते आणि मग इतरांशी जुळून घेणे कठीण होतं. हे असं आपल्या बाबतीत होतंय का हे आधी तपासून पहा. इतरांना दोष देण्यापूर्वी स्वतः मधल्या कमतरता जाणून घेतल्या पाहिजेत. मनुष्याचा स्वभाव असा असतो की, इतरांचे दुर्गुण आपल्या चटकन नजरेत भरतात. पण स्वतःच्या उणिवा मात्र दिसत नाहीत. पण प्रत्येक मनुष्यात काही ना काही कमी असणारच आहे. त्याचा स्वीकार करणे ते दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणे आणि आपले व्यक्तिमत्व सतत सुधारत राहणे हेच खरे माणूसपणाचे लक्षण आहे.
अशाप्रकारे हे आठ मार्ग आहेत जे आपण आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना हँडल करण्यासाठी वापरू शकतो.